जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२४ । राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून आज जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी छत्री-रेनकोर्ट घेऊनच बाहेर पडावे लागणार आहे.
जळगाव जिल्ह्यात आठ-दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला होता. मात्र यानंतर पावसाने पुन्हा ब्रेक घेतला होता. यामुळे तापमान वाढ झाली होती. मात्र शुक्रवारी पावसाने पुन्हा कमबॅक केलं. हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला शुक्रवार आणि शनिवार असा पावसाचा येलो अलर्ट दिला.
शुक्रवार देखील जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. यानंतर आज शनिवारी सकाळपासूनच पाऊस सुरु आहे. सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या शेतकरी व मजुरांना देखील परत यावे लागले. आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. या पावसामुळे शेती पिकाला मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्णपणे उघण्यात आले आहे. यामुळे तापी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, कल्याण, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाताना काळजी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलंय.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे नाशिक, जळगाव, नंदुरबार, या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.