जळगाव शहर

मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, संगीतमय भागवत कथेला प्रारंभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । सर्वजन कल्याणार्थ तसेच जीवनात चैतन्य मिळावे, आध्यात्मिक विकास व्हावा, मानसिक दुर्बलता नष्ट होऊन जीवन सुकर करीत आत्मिक बळ मिळावे यासाठी मेहरुण प्रभागात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दि.२५ रोजी श्रीमद् भागवत कथा पूजनाने किर्तन सप्ताहाला भाविकांच्या उत्साहात प्रारंभ झाला.

मेहरुण भागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा (संगीत) चे दि.२५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे यंदाचे २१ वे वर्षे आहे. हरिनाम संकीर्तन सप्ताह उत्सवाचा प्रारंभ गुरुवार दि.२५ रोजी झाला. सकाळी ९ वाजता श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन माजी महापौर नितीन लढ्ढा आणि माजी नगरसेविका अलका लढ्ढा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संतांच्या प्रतिमेसह प्रभागातील माजी नगरसेवक सुभद्राताई व सुरेश नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी बोदवड तालुक्यातील हभप. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांच्यासह श्रीमद् भागवत कथेतील सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभागातील नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य व सप्ताह आयोजक प्रशांत नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी उपस्थित होते. यावेळी महाआरती करण्यात आली.

दुपारी १ ते ४ यावेळेत श्रवणीय संगीतमय भागवत कथेला ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी सुरुवात केली. कथा वाचक ज्ञानेश्वर महाराज यांनी पहिल्या दिवशी कथा महात्म्य वर्णन करीत श्रीमद् भागवत कथा ही जनकल्याणकारी व भाविकांना मन:शांतीच्या मार्गावर नेणारी असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर महाराज यांना विणेवर निवृत्ती महाराज माळी, भास्कर महाजन, पेटीवर टाकळीचे कृष्णा महाराज, मृदुंग व तबल्यावर राजूरचे ज्ञानेश्वर महाराज यांनी साथ दिली. गहूखेड्याचे लखन महाराज आणि कौली ता.सोयगाव येथील जीवन महाराज यांनी कथेतील प्रसंगांचे गायन करीत कथा सुश्राव्य केली. टाळकरी मेहरुणमधील श्रीराम भजनी मंडळ आणि श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळ होते. सप्ताहच्या यशस्वीतेसाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीराम तरुण मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, जय दुर्गा ग्रुप, साई दत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी तसेच मेहरुणचे ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button