⁠ 

हनुमान जयंती विशेष : जळगावात आहे लोण्याचा हनुमान, उन्हाळ्यातही वितळत नाही लोणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । श्रद्धा आणि भक्ती असली म्हणजे काहीही शक्य होते. एरव्ही आपण लोणीपासून तयार केलेले पदार्थ ऐकलेले आहेत परंतु लोणीपासून चक्क हनुमानाची मूर्तीच साकारली असल्याचे कधी ऐकण्यात नसेल. जळगाव शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर वसलेल्या रिधुर येथील अवचित हनुमान मंदिरात स्वयंभू हनुमानाची मूर्ती आहे. कधी एकेकाळी एका भक्ताने मानलेला नवस पूर्ण झाल्यानंतर त्याने लोण्याचा नैवेद्य हनुमानाला अर्पण केला. पुढे जसजशी ख्याती पसरली तशी पौर्णिमा आणि अमावस्येला लोण्याचा नैवेद्यच चढविणे सुरु झाले. आज संपूर्ण हनुमानाची मूर्ती लोण्याने साकारलेली आहे. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यात देखील लोणी वितळत नसल्याने भाविकांची श्रद्धा अधिकच दृढ होते. दरवर्षी हनुमान जयंतीला मंदिरात विशेष कार्यक्रम होत असतात.

जळगाव शहरापासून २० किलोमीटर अंतरावर विदगावच्या पुढे असलेल्या रिधूर गावालगत रस्त्यावरूनच दिसणारा भव्य कळस असलेले मंदिर म्हणजे श्री अवचित हनुमान मंदिर. तापी नदीच्या काठावर असलेले अवचित हनुमान मंदिर लोण्यापासून तयार केलेल्या हनुमानाच्या वैशिष्‍ट्‍यामुळे ओळखले जाते. मंदिराचा मोठा परिसर असून भव्य सभामंडप देखील आहे. १९८६ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोळगाव येथून आलेल्या स्वामी माधवदास यांचे अवचित हनुमान मंदिराच्या कायापालटात मोठे योगदान राहिले आहे. स्वामी माधवदास यांच्या प्रयत्नांनी मंदिर पुन्हा नावारूपास आले. या तीर्थक्षेत्राची देखभाल स्वामींच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी कौशल्यादास या पाहतात.

स्वयंभू मूर्तीची ‘अशी’ आहे आख्यायिका
अवचित हनुमान मंदिरालगत कधीकाळी खूप मोठे वडाचे झाड होते. आजूबाजूच्या परिसरातील गुराखी त्यांची जनावरे परिसरात चारण्यासाठी येत आणि येथेच झाडाखाली थोडी विश्रांती घ्यायचे. अशात एका गुराख्याला स्वप्न पडले, की वडाच्या झाडाखाली एक हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. जमीन खोदून मूर्ती वर काढल्यावर तिची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर गावाचे कल्याण होईल, असा दृष्टांत त्याला मिळाला. जवळपास सर्वच गुराख्यांना स्वप्नात तसा दृष्टांत मिळाल्यावर गावात चर्चा सुरू झाली. त्यादृष्टीने गावकऱ्यांनी वडाच्या झाडाखाली खोदकाम केले. मात्र, गावातील मोठ्या जमीनदाराने त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला. मात्र, काही दिवसांनी जमिनदारालाही स्वप्नात हनुमानाचा दृष्टांत मिळाला. शेवटी सर्वांच्या प्रयत्नांनी जमिनीतून हनुमानाची मूर्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु झाला. जमिनीतून हनुमानाची मूर्ती मिळून आल्यावर त्या स्वयंभू मूर्तीची त्याच ठिकाणी बांधलेल्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. अचानक प्रगटलेल्या हनुमानाला ‘अवचित हनुमान’ संबोधले जाऊ लागले.

लोणी चढविण्याच्या प्रथेला सुरुवात
मंदिराची स्थापना झाल्यावर गावातील एका व्यक्तीकडे त्यांचे नातेवाईक मुक्कामाला थांबले. त्‍यांनी त्‍यांच्या दूध न देणारी म्हैस पूर्ववत दूध देऊ लागल्यावर तुला लोण्याचा नवस दाखवेल, असे बोलून त्यांनी अवचित हनुमानाला साकडे घातले. यानंतर हनुमानाचा चमत्‍कार म्‍हणावा की काय म्‍हणून त्यांच्या म्हशीने दुसऱ्याच दिवशी दूध दिले. यानंतर सदर व्यक्तीने लोण्याचा गोळा घेऊन हनुमानाच्या मंदिरावर येण्यासाठी निघाले. मात्र येताना त्यांना अंधार झाल्‍याने सकाळी नवस फेडण्याच्या विचाराने लोण्याचे भांडे छताला टांगून त्यादिवशी नातेवाईकांकडेच मुक्काम केला. त्याच रात्री ज्यांच्याकडे ते मुक्कामी थांबले होते त्यांच्या घराला अचानक आग लागली. आगीत सगळे काही जळून खाक झाले. पण लोण्याचे छताला टांगलेले मडके जशाचे तसे राहिले. नंतर त्यातील लोणी अवचित हनुमानाला नवस फेडण्यासाठी अर्पण करण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला अवचित हनुमानाच्या मूर्तीस लोणी चढविण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे.

उन्हाळ्यातही लोणी असते शाबूत
लोण्यापासून साकारलेल्‍या मारोतीच्या मुर्तीवर दरवर्षी लोणी लावले जाते. मुर्ती लोण्याची असली तर त्‍यावर कोणत्‍याही प्रकारचा परिणाम जाणवून येत नाही. विशेष म्‍हणजे उन्हाळ्यात जळगाव जिल्‍ह्‍यातील तापमान हे ४५ अंश सेल्‍सिअसच्या पुढे असल्यानंतर देखील लोणी कायम असते. पूर्वी लोणीच्या हनुमानाला सहज स्पर्श करता येत होता, परंतु त्यामुळे भाविक लोण्यात हात घालत असल्याने मंदिर व्यवस्थापनाने बाहेरून काचेची पेटी बसविण्याचा निर्णय घेतला. भाविकांना जवळून मूर्तीचे दर्शन घेता ये असल्याने लोणी सहज दृष्टीस पडते.

हनुमान जयंतीला उत्सव, रात्रभर भजन
अवचित हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळपासूनच भजनाचे आयोजन करण्यात येते. मध्यरात्री आरती करण्यात येऊन प्रसाद वाटप केला जातो. अनेक भाविकांकडून मंदिर परिसरात उपवासाची साबुदाणा खिचडी, सरबत, थंड पाण्याची व्यवस्था करण्यात येते. जळगाव जिल्ह्यातील अनेक भाविक चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी शिरागड येथे पायी, सायकल आणि वाहनाने जात असतात. देवीच्या दर्शनानंतर भाविक हनुमान जयंतीनिमित्त अवचित हनुमान येथे दर्शन घेऊन घरी परततात.