जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । कोकणावर कोसळलेल्या पूरसंकटावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्यानंतर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यास प्रत्युत्तर दिले आहे. ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे आपत्तीतही राजकारण करत आहे. नारायण राणे पांढऱ्या पायाचे असल्यानेच ते मंत्री झाल्यामुळे कोकणवर ही आपत्ती कोसळली आहे’, अशा बोचऱ्या शब्दांत शिवसेनेचे उपनेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आमदार निधीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सरदार पटेल लेवा भवनात दिव्यांगांना साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी पुराच्या आपत्तीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेचा समाचार घेतला.
गुलाबराव पाटील म्हणाले की, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर जी नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्या आपत्तीतून सावरण्यासाठी सरकार काम करत आहे. या आपत्तीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे आपत्तीतही राजकारण करत आहेत. नारायण राणे पांढऱ्या पायाचे असल्यानेच ते मंत्री झाल्यामुळे कोकणवर ही आपत्ती कोसळली असल्याची टीका गुलाबरावांनी केली. आरोप-टीका करण्यासाठी नेहमीच राजकीय आखाडा हा रिकामा असतो.
मात्र, आपत्तीमध्ये पीडितांना सहकार्य करणे हेच लोकप्रतिनिधींचे पहिले कर्तव्य असते. हे कर्तव्य राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर नेते देखील पार पाडत आहेत. तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अशा आपत्तीत राजकारण न करता काम करण्याची गरज असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.