जळगाव लाईव्ह न्युज | १५ एप्रिल २०२२ | जलदान हे सर्वोच्च दान मानले जाते. सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्यामुळे जीवाची लाहीलाही होत असतांना अनेक दात्यांनी ठिकठिकाणी पाणपोया सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने पाळधी येथील मेन रोडवर आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: पाणपोईवर पाणी वाटप केल्याने उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. मंत्री बनूनही भाऊंमधील सर्वसामान्यांची कळकळ ही यातून दिसून आली. आणि परिसरात हाच चर्चेचा विषय बनला.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे राज्यातील आज महत्वाचे मंत्री असले तरी त्यांची सर्वसामान्यांशी जुडलेली नाळ ही कायम असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आज पाळधी येथील नागरिकांना याचीच पुन्हा प्रचीती आली. याला निमित्त ठरले तर येथील मुख्य चौकातील पाणपोईच्या उदघाटनाचे ! सदर पाणपोई ही पाळधीचे प्रगतिशील शेतकरी कै.सतिष रामदास पाटील व कै.सुभाष नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ युवा उद्योजक योगेश पाटील व बारकू पाटील यांनी सुरू केली आहे. या पाणपोईचे आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी नुसते उद्घाटन न करता त्याठिकाणी आलेल्या नागरिकांना स्वहस्ते पाणी देखील पिण्यासाठी दिले. यामुळे उपस्थित नागरिक चकीत झाले. पालकमंत्री हे राज्याचे पाणी पुरवठा मंत्रीदेखील आहेत. त्यांनी जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला पुरेसे पाणी देण्याचा संकल्प घेऊन तो तडीस नेण्याचे प्रयत्न केले आहेत. या अनुषंगाने आज थेट पाणपोईवर पाणी वाटून त्यांनी आपली सर्वसामान्यांसोबत जुडलेली नाळ कायम ठेवल्याचे दिसून आले.
यावेळी उद्योजक दिलीप पाटील, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील,मुकुंदराव नन्नवरे, हेमंत पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, चंदू माळी, दिगु माळी, पप्पू माळी, भगवान मराठे, भुषण महाजन, राजू पाटील, अमित पाटील, रोहन पाटील यासह अन्य उपस्थित होते.
युवा उद्योजकांनी जाणिले पाणीपोईचे महत्व
तहानलेल्यांची तृष्णा भाग्यविण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की सामजिक कार्याचे भान ठेऊन काही सामजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोया सुरू करत असत. परंतु अलीकडच्या काळात पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि पाणपोईचा धर्म बाटलीबंद झाला. अन् समाजातील सहदयता संपली की काय? म्हणूनच दुष्काळात पाणपोया लुप्त होत चालल्याची खंत नागरिकांकडुन व्यक्त होत आहे.
तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच पूर्वी सामजिक कार्यात अग्रेसर असणार्यां संस्था, संघटना सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी पाणपोई सुरू करायचे. यात काही संवेदनशील नागरिकदेखील स्वतःच्या घरासमोरील जागा पाणपोईसाठी उपलब्ध करून द्यायचे. नागरिकांची तहान भागविण्याचे पुण्य लाभावे, या उद्देशाने सेवाभावातून हे काम केले जायचे. रस्त्यावरून जाणारी तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली, की आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी घशाखाली उतरवायची आणि नंतरच पुढचा मार्ग धरायची. काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात ग्रामीण भागात हे चित्र दृष्टीस पडायचे. आज मात्र दुर्दैवाने अशा स्वरूपाचा कुठलाही उपक्रम सामाजिक सेवेच्या भावातून जपला जात नसल्याचे दिसत आहे.
‘पाणपोई’ हा एक सामजिक उपक्रम व तहानलेल्यांना पाणी पाजणे हे पुण्याचे काम समजले जायचे. पाणी विकणे हा अपराध समजला जायचा. परंतु काळ बदलला आणि लोकांनी पाण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे जागोजागी आत्ता वॉटरफिल्टर उभे झाले. शुद्ध आरओचे पाणी पिणे अलीकडे फॅशन झाली असल्याने पाणपोईतील पाणी पिणे कमीपणाचे लक्षण समजु लागले. त्यामुळे ‘पाणपोई’ लुप्त होऊ लागल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातुन येणार्यां नागरिकांची विकतची पाणी पिण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे हे लोक पाण्यासाठी हॉटेल, चहाच्या टपरीचा आधार घेतात.
वास्तविक तहान कमी झालेली नाही. परंतु समाजातला सेवाभाव संपत चालल्याने पाणपोयांची संख्या मात्र झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे.बसस्थानकावर पाण्याची सोय नसल्याने प्रवाश्यांना विकतचे पाणी घेऊन पिणे शक्य नसते. यासाठी पाळधी मेन रोडवर आम्ही पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. पाळधीसध्या उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत आहे. रस्त्यावर जाणार्या अबालवृध्द महिला व वयस्कर व्यक्तींना तहान लागल्यास हॉटेल व चहाच्या टपरीचा आधार घ्यावा लागत असे. त्यामुळे सामजिक बांधिलकीतुन नागरिकांना फिल्टर केलेले थंडगार पाणी मिळावे या हेतुने ‘पाणपोई’ सुरू केली आहे. अस योगेश पाटील व बारकु माळी यांनी सांगितले.