जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील राजकीय धोरणात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांमध्ये, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही. स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना स्वबळावर लढणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील यांनी मीडिया शी संवाद साधताना सांगितले की उद्धव ठाकरे यांचा सारा खटाटोप फक्त स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू आहे. ते म्हणाले, “ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना ‘तू राहतो का मी राहतो’ असं म्हटलं होतं, तेच ठाकरे आज त्यांची पप्पी घेत आहेत. आता ते स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी वाटेल त्या ठिकाणी जात आहेत.” मंत्री पाटील यांनी यावेळी ठाकरे गटाच्या भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नांवरही निशाणा साधला.
पाटील म्हणाले, “आता ते काँग्रेसशी फारकत घेत आहेत, राष्ट्रवादीशी फारकत घेत आहेत. काही राष्ट्रवादीचे नेते नाराज होऊन नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे चित्र काही ठिकाण्यावर नाही. पुढच्या काळात डबडं वाजणार आहे.” त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देताना सांगितले की “जेव्हा आपली गरज होती, जेव्हा आपला पक्ष अडचणीत होता, जेव्हा मोदींचं सरकार येण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो, तेव्हा हे लोक कोणासोबत होते? आता यांच्याकडे काहीच राहिलं नाही. त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत, तुमच्याशी गोड बोलत आहेत. पण हे कुणाचेच नाहीत. याचा निश्चितपणे विचार करावा.”
आपण आपली मूळ विचारधारा सोडली होती हे त्यांना आता कळायला लागलं आहे.जो बूंद से गयी वो हौद से नही आने वाली. ज्यांनी भगवा सोडला, त्यांनी पुन्हा भगवा पकडला की हात थरथरतात हे आता त्यांच्या लक्षात आलं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.