⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

गुलाबराव देवकरांचे सोईचे राजकारण राष्ट्रवादीसाठी डोकंदुखी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाची राज्यात मोठी पडझड झाली असतांना जळगाव जिल्हा हा भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या पाठीशी उभा असल्याचे विधानसभानिहाय मताधिक्याच्या आकडेवारीवरुन दिसते. यामुळे महायुतीच्या नेत्यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी उबाठा व राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) उमेदवारांना मिळालेली मते ही दोन्ही पक्षांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. यामुळे विधानसभा निवडणूक चुरशीची ठरेल, असे स्पष्ट संकेत आहेत.

जिल्ह्यात जळगाव ग्रामीण हा हायहोल्टेज विधानसभा मतदारसंघ असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. कारण शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाकडून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे इच्छूक आहेत. यामुळे येथे आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने शिवसैनिक कुणाच्या पाठीमागे उभे राहतात ? याचे उत्तर या निवडणुकीत मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना जळगाव ग्रामीणमधून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ६३,१४०चे मताधिक्य दिले आहे. यामुळे या मतदारसंघावर अजूनही गुलाबराव पाटील यांची पकड असल्याचे दिसून येत आहे. गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या विरोधात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी तयारी सुरु केली आहे. देवकर हे गेल्या काही वर्षापासून सक्रिय राजकारणापासून लांब होते. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

जळगाव ग्रामीण मतदार संघातून २००९ साली गुलाबराव देवकरांनी गुलाबराव पाटलांचा पराभव केला होता. यावेळी त्यांची राज्यमंत्री पदावर वर्णी देखील लागली. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील त्यांना मिळाले. मात्र ते कधीच मतदारसंघावर पकड मिळवू शकले नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव देवकर घरकुल प्रकरणी कारागृहात होते. निवडणुकीनंतर कारागृहातून बाहेर पडल्यानंतर गुलाबराव देवकर सक्रिय राजकारणापासून चार हात लांबच राहिले. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवकर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. देवकर केवळ निवडणुकीच्या दिवसांमध्येच सक्रिय होतात व नंतर मतदारसंघात फिरकत देखील नाही, ही राष्ट्रवादी (शरद पवार गट)साठी मोठी डोकंदुखी ठरणार आहे.