पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ठाकरे गटावर ‘डबल वार’ !

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२३ । धनुष्यबाण कोणाकडून पेलवला आणि कोणाकडून पेलवला गेला नाही, हे सगळ्यांना माहित आहे. हाच धनुष्यबाण ३५ वर्षे आमच्याच हातात होता. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने पुढेही हा धनुष्यबाण आम्ही पेलू. प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा. घोडामैदान लांब नाही तेव्हा चित्र स्पष्ट होईलच, असे आव्हान पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रविवारी जळगावात दिले.

जळगाव महापालिकेच्या वतीने महामार्गावर उभारण्यात आलेल्या पथदिव्यांचा शुभारंभ गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रविवारी रात्री ८ वाजता करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत धनुष्यबाण रावणाकडूनही पेलवला गेला नाही अशा शब्दात शिंदेसेनेवर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमात उत्तर दिले. यावेळी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महापौर जयश्री महाजन, नगरसेवक ललित कोल्हे, आश्विन सोनवणे, अॅड. शुचिता हाडा, उज्ज्वला बेंडाळे, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


याच बरोबर शनिवारी धरणगाव येथे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणले होते कि, मी साध्यासुध्या बारक्यांच्या नादी लागत नाही. त्यामुळे माझ्याही नादी लागू नका. मी साधा माणूस नाही. मी संजय राऊत सारख्यांना घाम फोडतो त्यामुळे बाकीचे कुठे लागले..? अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. शनिवारी धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे विविध विकासकामांचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

उत्तर दिले.