जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२३ । सध्या काळ बदलत चालला तशा रूढी- परंपरांना फाटा देत आता सर्वच ठिकाणी महिलांना संधी देण्यात येते. दरम्यान, अमळनेर तालुक्यातील जानवे येथे वृद्धेच्या निधनानंतर घरात कर्ता नसल्याने आणि नातूही जवळ नसल्यामुळे रुढी परंपरा यांना फाटा देऊन नातीनेच आजीला अग्निडाग देऊन समाजापुढे आदर्श घालून दिला.
जानवे येथील लक्ष्मीबाई भटू पाटील पती आणि मुलांसह वास्तव्यास होत्या. मात्र गेल्या चार वर्षांपासून लक्ष्मीबाई यांना कर्करोगाने ग्रासल्याने त्या मृत्यूचा सामना करत असताना दोन वर्षांपूर्वी एकुलता एक मुलगा जग सोडून गेला. लक्ष्मीबाईला हे दुःख कमी होते की काय म्हणून वर्षभरापूर्वी पतीचेही निधन झाले. सून सीमा पाटील यांनी त्यांची सेवा केली.
याच दरम्यान ३० सप्टेंबर रोजी सकाळी लक्ष्मीबाई यांनी सुद्धा जगाचा निरोप घेतला. लक्ष्मीबाई यांना पाच मुली, नातू ,नात सून असा मोठा परिवार आहे. नातू बाहेरगावी शिक्षणाला असल्याने येऊ शकला नाही. सर्वसाधारणपणे मुलबाळ नसलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी पुतण्या, नातू यांना बोलावण्यात येते. तर दुसरीकडे मुली स्मशानात जात नाहीत, अशी प्रथा आहे. या प्रथेला आणि परंपरेला फाटा देत लक्ष्मीबाई यांची नात तेजस्विनी ही आपल्या आजीबाईला मुखाग्नी देण्यासाठी तयार झाली.
दरम्यान, तेजस्विनीने आपली आजी लक्ष्मीबाईला अग्निडाग दिला आणि जलदानही केले. सर्व रूढी परंपरांना फाटा देऊन अग्निडाग आणि जलदान करत तेजस्विनी हिने समाजासमोर अनोखा आदर्श घालून दिला आहे.