जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगावातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात शेअर मार्केटच्या नादामुळे कर्जबाजारी झालेल्या नातवाला आजीने रागविले. याचा राग आल्याने नातवाने आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. यात लीलाबाई विसपुते (७३, रा. जळगाव) या वृध्द महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जळगाव शहरातील महाबळ परिसरात वास्तव्यास असलेल्या लीलाबाई रघुनाथ विसपुते (वय ७०) असे घटनेत जखमी झालेल्या वृद्धेचे नाव आहे. तर तेजस विलास पोतदार असे हल्ला करणाऱ्या नातवाचे नाव आहे. या प्रकरणी तेजस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान धरणगावात राहत असलेली मुलगी वैशाली हिच्याकडे लीलाबाई या २५ जूनला गेल्या होत्या. याचवेळी हि घटना घडली आहे.

वैशाली पोतदार यांचा लहान मुलगा तेजस पोतदार याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असून यामुळे त्याने मोठ्या प्रमाणावर कर्ज केले असल्याचे वैशाली यांनी आई लीलाबाई यांना सांगितले. तसेच तेजस हा जळगावी मामाच्या घरी सहा महिने राहिला असता त्यावेळी देखील अनेकजण त्याच्याकडे पैशांच्या मागणीसाठी यायचे. यामुळे आजी लीलाबाई तेजसला रागवायची. तर २६ जूनला तेजस आणि लिलाबाई यांच्यात वाद झाला.

तेजसला बोलल्यानंतर लीलाबाई या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. मात्र आजीने रागविल्याचा राग आल्याने तेजस हा कुऱ्हाड घेवून आला. त्यावेळी तेजसने झोपलेल्या आजीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यानंतर कुऱ्हाड बाजूला ठेवून मोठ्या भावाकडे पळत जाऊन आजीवर कुणीतरी कुऱ्हाडीने हल्ला केल्याचे सांगितले. रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत पडलेल्या वृध्द लिलाबाई यांना तातडीने रूग्णवाहिकेतून जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक आहे.









