जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२४ । आजीच्या घरातील कपाटातून रोख रकमेसह दागिने चोरून ते विकण्यासाठी गेलेल्या नातवाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बळीराम पेठेतून अटक केली. योगेश पाटील असं चोरी करणाऱ्या नातवाचे नाव असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
नेमका प्रकार काय?
शहरातील शिवाजीनगरात एकट्याच राहत असलेल्या गोदावरी पंडित पाटील (८८) या वृद्ध महिलेच्या घरी त्यांची मुलगी आणि नातू हे आले होते.घरात झोपलेले असताना योगेश पाटील याने कपाटातून महिलेचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयिताचा शोध घेत असताना संशयित योगेश पाटील हा चोरलेले दागिने विक्रीसाठी बळीराम पेठ परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार योगेशची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरलेले दागिने सापडले.त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हे दागिने आजीच्या घरुन चोरी केल्याची कबुली दिली.पथकाने दागिने जप्त करून संशयिताला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास सपोनि रामचंद्र शिखरे करीत आहेत.