जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । एकीकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार 5 जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. 4 ऑगस्ट रोजी मतदान, तर 5 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. 271 ग्रामपंचायतीमध्ये जळगाव जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीत रणधुमाळी गाजणार आहे.
या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज माहिती दिली.मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 62 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार संबंधित तहसीलदार 5 जुलै 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 जुलै 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 16 आणि 17 जुलै 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 जुलै 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होईल.
जळगाव जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतींचा समावेश
राज्य निवडणूक आयोगानं 271 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतींचा समावेश. त्यात रावेर तालुक्यातील १२, अमळनेर १, एरंडोल २, पारोळा ३ तर चाळीसगाव तालुक्यातील ६ ग्रामपंचातींचा समावेश आहेत.