⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

प्रवीण चव्हाण यांच्याकडून शासनाने वसुली करावी : तेजस मोरे करणार गृह विभागाकडे मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । विशेष सरकारी वकील म्हणून मोड्स ऑपरेंडीने आणि राजकीय प्रभावाने काम करणाऱ्या प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून गृह विभागाने नियुक्ती रद्द करतांना ज्या १९ खटल्यांचे काम त्यांच्याकडून काढून घेतले आहे त्या खटल्यांसाठी त्यांच्यावर झालेला खर्च वसूल करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे तेजस मोरे यांनी ‘जळगाव लाईव्ह’सोबत बोलताना म्हटले आहे.

मूळ जळगाव येथील मात्र पुण्यात बांधकाम व्यावसायिक असलेले तेजस मोरे यांनी प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन केले होते असा आरोप त्यांच्यावर त्यावेळी झाला होता. दरम्यान, तेव्हा प्रवीण चव्हाण हे कुटील हेतूने आणि बेकायदेशीर पद्धतीने भाजपाचे नेते गिरीश महाजन यांना मकोका कायदा लावून अडकवण्याच्या प्लॅनिंगने काम करीत असल्याचा खुलासा माध्यमांसमोर मोरे यांनी केल्याने ते चर्चेत आले होते.

प्रवीण चव्हाण यांनी मोरे यांच्या विरुद्ध चोरी – छुप्या पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले म्हणून तर तेजस मोरे यांनी चव्हाण यांनी मनाविरुद्ध जबाब टाईप करणे, कुटील हेतूने पोलीस तपासात चुकीच्या पद्धतीने काम करायला भाग पाडले म्हणून पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनला एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. मोरे म्हणाले कि, शिवाजी नगर पोलिसात दिलेल्या तक्रारीचा तपास सुरू असून यात प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश द्यावेत म्हणून १५६ (३) प्रमाणे न्यायालयात सुद्धा पाठपुरावा करीत आहेत.

दरम्यान, प्रवीण चव्हाण यांना गृह खात्याने १९ खटल्यांचे कामकाज काढून घेत त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती रद्द केल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित ठेवून आणि यापैकी अनेक खटल्यात राजकीय प्रभावाने काम केले असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याकडून या खटल्यांचे काम करतांना शासनाने दिलेले वेतन,
प्रवास भत्ता आणि इतर सुविधांवर केलेल्या खर्चाची वसुली करावी, अशी मागणी करणार असल्याचे तेजस मोरे यांनी प्रसिध्दी पत्रान्वये कळवले आहे.