शुक्रवार, डिसेंबर 1, 2023

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, ‘ही’ पद्धत बंद होणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. केळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या केळीमालातून ३ टक्के सूट घेऊ नये आणि शेतकऱ्यांनी देखील ही सूट देऊ नये; असे आढळून आल्यास व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय येथे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.

या प्रस्तावाला उपसभापती योगेश पाटील यांच्यासह सर्वच संचालकांनी पाठिंबा दिला.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात केळी खरेदी विक्रीची ही पद्धत सुरू होती. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विकलेल्या केळीच्या एकूण वजनापैकी ३ टक्के मालाचे पैसे व्यापारी शेतकऱ्यांना देत नसत आणि शेतकरी ही विना तक्रार ३ टक्के कमी रक्कम स्वीकारत असत.

मात्र तीन टक्के सूट घेणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध संबंधित केळी उत्पादक शेतकऱ्याने तक्रार केल्यास त्या व्यापाऱ्याचा केळी खरेदी-विक्री करण्याचा परवाना बाजार समिती रद्द करू शकते तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही केली जाऊ शकते, अशी तरतूद बाजार समितीच्या नियमांत आहे.