जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२५ । सोन्याच्या भावाने मागील महिन्यात हाहाकार गाजवला होता. या महिन्याची सुरुवातही महागाईनेची झालेली पाहायला मिळाली. सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात बुधवारी सोने दरात १०० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याने पुन्हा ९१७०० (जीएसटीसह ९४४५१) रुपये प्रति तोळ्याचा सार्वकालीन उच्चांक गाठला.

सोन्यातील वाढ ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टेरिफचा परिणाम मानला जात आहे. तर टेरिफ वॉरमुळे, सोन्याने विक्रमी पातळी गाठली आहे. मार्च महिना सोने गुंतवणूकदारांसाठी परतावा देणारा ठरला. या महिन्यात पाच हजारांहून अधिक रुपये सोने गुंतवणुकीत मिळाले.
यावर्षी आजपर्यंत सोन्यात ३१ वेळा दरवाढ झाली आहे. २०२५ च्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीला शुद्ध सोन्याचे दर ७६९०० रुपये तोळा होते. तेजीच्या या रॅलीने २ एप्रिलला पुन्हा उच्चांक गाठला आहे. तर सहा दिवसानंतर चांदीत किलोमागे १००० रुपयांनी घसरण झाली आहे. बुधवारी (२ एप्रिल) चांदी १,०१,००० रुपये किलोवर स्थिरावली. याआधी २८ मार्चपासून चांदीचे दर १,०२,००० रुपये किलोवर (जीएसटीसह १,०५,०६०) कायम होते.
लग्नसराईत सोन्याचा दर वाढणार?
लग्नसराईच्या काळात सराफा बाजारात मोठी उलाढाल होते. या काळात वधू आणि वरपक्षाकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने केले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे यावेळच्या लग्नसराईतही सोने आणि चांदीच्या दारात वाढ होणार का? तसेच ही वाढ किती होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आगामी काळात सोन्याच्या दरात वाढ झालीच तर सामन्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.