जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीचा भाव सातत्याने वाढत आहे. सोन्या-चांदीचे भाव रोज नवनवे विक्रम रचत आहेत. दरम्यान, सध्या लग्नसराई सुरु असून त्यात उद्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा सण आहे. गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येलाच सोन्यासह चांदीने मोठा डोंगर गाठला आहे. दोन्ही धातूंच्या चढ्या दरामुळे खरेदीदारांची चिंता वाढली आहे.
जळगावातील दर
जळगावच्या सोने बाजारात आज (8 एप्रिल) पुन्हा एकदा सोन्याचा दर वधारला. आज २४ कॅरेट दहा ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी जवळपास ७१,३०० रुपये मोजावे लागत आहेत. जीएसटीसह सोन्याचा हा दर थेट ७३ हजार ५०० वर पोहोचला आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचा भावदेखील चांगलाच वाढला आहे.
जळगावात चांदीचा दर ८२ हजार रुपयावर पोहोचला आहे. गेल्या सात दिवसात चांदीच्या भावात प्रतिकीलो ६ हजार रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान पाडव्याच्या मुहूर्तावर लोक सोने-चांदीची दागिने खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने -चांदीचे भाव वाढल्याने ग्राहक खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचं दिसतंय