जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२३ । दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली असून ऐन दसऱ्याला सोन्यासह (Gold Rate) चांदीने (Silver Rate) मोठी उसळी घेतली होती. त्यामुळे आता अनेकांनी दिवाळीत सोने-चांदी खरेदीचा संकल्प केला असेल. मात्र अद्यापही सोन्याचा दर विनाजीएसटी 61 हजारावर आहे. तर चांदीचा दर 72 हजारावर आहे. यामुळे आता दिवाळीपर्यंत दोन्ही धातूंचे दर कुठवर राहणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. Gold Silver Rate Today
दरम्यान, गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत घसरण होती. मात्र जागतिक घडामोडींमुळे आणि युद्धामुळे भाव पुन्हा भडकले.गेल्या महिन्यात किंमती चार हजारांनी वधारल्या. मात्र, सोन्याच्या दरात तेजीचे वातावरण असताना अचानक घसरण झाली आहे.
ऑक्टोबरचे शेवटचे दोन दिवस आणि नोव्हेंबरची पहिली तारीख, अशा तीन दिवसांत सोन्यात 1020 रुपयांची स्वस्ताई आली. 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे 230 रुपये, 550 रुपये आणि 320 रुपयांनी किंमती घसरल्या. 2 नोव्हेंबर रोजी 110 रुपयांची दरवाढ झाली. आता 22 कॅरेट सोने 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या घसरणीमागे बाजारपेठेतील घटलेली मागणी काही प्रमाणात जबाबदार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सोन्याचे दर ऑगस्ट महिन्यात 57 ते 58 हजार रुपयांच्या दरम्यान होते. त्यात ऑक्टोबर महिन्यात वाढ होत अखेरीस 62 हजारांचा टप्पा गाठला गेला होता. मुळात दिवाळीत सोन्याचे दर 62 हजारांचा टप्पा पार करतील, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला होता.मात्र सोन्याच्या किमतीने हा टप्पा त्याआधीच ओलांडला. त्याला कारणीभूत जागतिक घडामोडींमुळे आणि इस्त्राईल-हमास यांच्यातील युद्ध होते.
चांदीच्या दरातही मोठी घसरण
गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती. गेल्या दोन दिवसांत, 31 ऑक्टोबर रोजी चांदीत 300 रुपयांची तर 1 नोव्हेंबर रोजी 1200 रुपयांची घसरण झाली होती. 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली. सध्या एक किलो चांदीचा भाव 72,500 रुपये आहे. गुडरिटर्न्सनुसार हे दर आहेत.