जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२४ । देशात सणावाराला, लग्न समारंभात, कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी खरेदी केली जाते. गेल्या मे महिन्यात दोन्ही धातूंच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकीवर पोहोचले आहे. मे महिन्यात सोन्याचे दर प्रती तोळ्यामागे अवघ्या ३०० रुपयांनी वाढले तर चांदी प्रती किलोमागे तब्बल ११ हजारांनी महागली आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडीने सोने-चांदी दरात असे चढउतार होत असतात
मे च्या पहिल्या तारखेला सोन्याचे दर ७२,५०० रुपये प्रति तोळा होते. २० मे रोजी ते महिन्याभरातील उच्चांकी ७४९०० रुपये तोळ्यावर गेले; परंतु पुन्हा दरात घसरण झाल्याने ३१ मे रोजी ७२८०० रुपये झाले. महिन्याभरात ३०० रुपये प्रति तोळ्याची वाढ झाली आहे. १ मे रोजी चांदी ८१ हजार रुपये किलो होती. हे दर पाच दिवस स्थिर होते. महिन्याभरात ते १२ वेळा वाढले आणि व २ वेळा घसरले. तर २० मे रोजी उच्चांकी ९४ हजारांवर पोहोचले. पुन्हा घसरण होत महिना अखेरीस ९२ हजार रुपयांवर स्थिरावले. महिन्याभरात ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
सध्याचे दर
सध्या जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचा २४ कॅरेटचा भाव ७२,३०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर जीएसटीसह सोने ७४,४६०रुपये इतका आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर विनाजीएसटी ९२,३०० रुपये प्रति किलो इतका आहे.
चीनने चांदी खरेदी वाढवली
इस्त्राइल-इराण युद्धजन्य परिस्थितीने चांदीच्या दरात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दराने आधीच उच्चांक गाठल्याने त्यात फारशी तेजी आली नाही; परंतु चांदीचे दर अनेक दिवसांपासून वधारले नव्हते. यासह औद्योगिक कारणासाठी चीनने मोठ्या प्रमाणात चांदीची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे चांदी चमकत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे