जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२३ । ऐन सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दराने मोठी झेप घेतल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही धातूंचे दर घसरून सात महिन्याच्या नीच्चांकीवर पोहोचले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यापूर्वी इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु झाल्याने त्याचा पडसाद सोने-चांदीवर दिसून आला. Gold Silver Rate Today
युद्धापूर्वी 6 ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर 55,500 रुपयावर आला होता. तर चांदीचा दर 68500 रुपयावर आला होता. मात्र गेल्या पंधरा दिवसात सोने जवळपास 6500 ते 6600 रुपयांनी वधारले आहे. तर चांदी 5000 ते 5100 रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे दिवाळीपर्यंत दोन्ही धातूंचे दर कुठवर जातात याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.
या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात मौल्यवान धातूने रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. त्यावेळीस सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी 63000 रुपयापर्यंत गेला होता. तर चांदीचा दर 77000 हजार रुपयापर्यंत गेला होता. मात्र मध्यंतरी सोने-चांदीला उंच भरारी घेता आली नाही. जून मध्ये घसरण झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट मध्ये पुन्हा वाढ दिसून आली होती.
मात्र ऑक्टोबरमध्ये पितुपक्षमुळे दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण दिसून आली. अगदी 15 दिवसांपूर्वी मौल्यवान धातूच्या किंमती कमी होतील, असा अंदाज असताना इस्त्राईल-हमास युद्धाने ग्राहकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. गेल्या चार महिन्यानंतर सोने-चांदीने लांबचा पल्ला गाठला आहे.
जळगावातील आजचे दर?
जळगावच्या सुवर्णनगरीत सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर 56,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 73,500 रुपयांवर गेला आहे.
दरम्यान, यापूर्वी गेल्या आठवड्यात (13 ऑक्टोबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 59000 रुपयावर होता. तर चांदीचा दर 70000 हजारांवर होता. मात्र गेल्या सात दिवसात सोने 2000 रुपयाने तर चांदी 3000 रुपयांनी वधारली आहे. यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचा दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.