सोन्याचा तोरा पुन्हा महागला, आज काय आहे प्रति 10 ग्रॅमचा भाव..
जळगाव लाईव्ह न्यूज । 2 मार्च 2024 । गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा भाव घसरून 63 हजार रुपयाच्या घरात आला होता. मात्र आता पुन्हा वाढून तो 63 हजार रुपयावर गेला आहे. या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आता सोने आणि चांदी महागाईचा रस्ता धरतात की ग्राहकांना दिलासा देतात, हे लवकरच समजेल.
या आठवड्याच्या सोमवारी सकाळच्या सत्रात जळगावमधील सुवर्णनगरीत सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी 62500 रुपयावर होता. तर चांदीचा एक किलोचा दर 71500 रुपयांवर होता. मात्र आज सकाळी सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 63,100 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी सकाळी सोन्याचा दर 62600 रुपयांवर होता. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 500 रुपयाची वाढ झालेली दिसून येत आहे.
चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास चांदीच्या दरात चढ-उताराचा काळ सुरु आहे. या आठवड्यात चांदीचा दर स्थिर आहे. सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 71500 रुपयावर आहे. दरम्यान,लग्नसराईत मागणी वाढत असून दोन्ही धातूंचे दर पुन्हा महाग होण्याची शक्यता आहे.