जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२६ । भारतात सोन्या-चांदीच्या दरांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दोन्ही धातूंचे दर कुठे कमी होतील, याची अपेक्षा ग्राहकांना असताना आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.
आज सोन्याचे दर १ लाख ४५ हजार रुपयांवर गेला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतींमध्ये इतकी मोठी वाढ झाली की 1 किलो चांदीची किंमत तब्बल 3 लाख रुपयांच्या पुढे गेली. इतिहासात पहिल्यांदाच चांदीने हा टप्पा ओलांडला आहे.

काय आहे सोन्याचा भाव?
आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढता राजकीय तणाव आणि जागतिक अनिश्चिततेमुळे दोन्ही धातूंमध्ये वाढ झालीय. आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १९१० रुपयांनी वाढून १,४५,६९० रुपये झाले आहे. तर २२ कॅरेटमागे सोन्याचे दर १,७५० रुपयांनी वाढले असून १,३३,५५० रुपये झाले आहेत.

चांदीही महागली
चांदीच्या किमती काही थांबण्याचे, कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आज १ किलोमागे १०,००० रुपयांची वाढ होऊन हे दर ३,०५,००० रुपये झाले आहेत.इतिहासात पहिल्यांदाच चांदीने हा टप्पा ओलांडला आहे.
दरवाढीचे कारण काय?
अमेरिकेने युरोपीय देशांवरही शुल्क लादले आहे जे ट्रम्पच्या ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या योजनेत अडथळा आणत असल्याचे दिसून येते. यामुळे तणाव आणखी वाढला आहे आणि गुंतवणूकदारांनी पुन्हा सुरक्षित आश्रयाच्या शोधात सोने-चांदीकडे वळायला सुरुवात केली आहे आणि परिणामी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
जळगावातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून चांदीच्या दराने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2 हजारांनी तर चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीसह सोन्याचे दर 1 लाख 48 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटी सह 3 लाख 3 हजार 850 रुपयांवर पोहोचले आहेत.






