जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२३ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत सुरु असलेल्या घसरणीमुळे दोन्ही धातूंचे दर सात महिन्याच्या नीच्चांकीवर आले होते. यामुळे दिवाळी खरेदीची ग्राहकांना संधी मिळाली होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीनंतर भारतीय सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे.
आज सोमवारी व्यवहाराच्या पहिल्या दिवशी सराफा बाजार तेजीसह उघडला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोमवारी (9 ऑक्टोबर) सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 640 रुपयांची वाढ दिसून आली. यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 57,600 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. या काळात चांदीच्या दरात प्रतिकिलो 380 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. यानंतर भारतीय सराफा बाजारात चांदीची किंमत 68,740 रुपये प्रति किलो झाली.
एमसीएक्सवरही दोन्ही धातूंच्या किमती वाढल्या
गेल्या दोन आठवड्यात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली. मात्र गेल्या आठवड्याच्या काही सत्रात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. MCX वर सोन्याच्या किमतीत 1.15 टक्क्यांनी म्हणजेच 653 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर सोने 57,524 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर चांदीच्या दरात 1.33 टक्क्यांनी म्हणजेच 905 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर MCX वर चांदी 69,075 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.
रशिया-युक्रेन युद्धातून अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अजून नीट सावरल्या नव्हत्या आणि आता इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाला तोंड फुटले आहे. या युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसणार आहे. प्रत्येकाला माहित आहे की भारतात सणाचा काळ आहे, ज्यामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करतात. अशा परिस्थितीत या युद्धाचा परिणाम दिसल्यास दागिने खरेदी करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.