जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२४ । जून महिन्यात दिलासा देणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतीने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झटका दिला. मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात चांदीने 5,000 रुपयांची मुसंडी मारली होती. तर सोन्याने 1500 रुपयांची आगेकूच केली होती.
मात्र चालू आठवड्याची सुरुवात नरमाईने झाली आहे. जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी उन्हाळ्यात सोने खरेदीचा सपाटा लावल्याने भाव वधारले होते. आता सर्वच केंद्रीय बँकांनी आवक घटवल्याने सोन्याने नरमाईचा सूर आळवला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला 8 जुलै रोजी सोने 220 रुपयांनी घसरले. तर आज सकाळच्या सत्रात सोन्याने घसरणीचे संकेत दिले आहे. दुपारनंतर भावात बदल दिसू शकतो.
दुसरीकडे चांदीत मात्र वाढ होताना दिसत आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात चांदीने 5,000 रुपयांची उसळी घेतली. या आठवड्याच्या सुरुवातीला पण चांदीची चमक कायम आहे. सोमवारी, 8 जुलै रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली.
काय आहे सोने-चांदीचा भाव?
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.