जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२४ । गेल्या आठवड्यात आणि जून महिन्यात ग्राहकांना सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठा दिलासा दिला होता. या महिन्यात दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आला नाहीय. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीने दरवाढीचा गिअर टाकला आहे. जळगाव सुवर्णपेठेत मंगळवारी चांदीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली तर सोने दरातही अवघ्या ५० रुपयांची वाढ झाली.
गेल्या महिन्यात चांदीचे दर ९२ हजारांपर्यंत गेले होते. ते महिन्याच्या शेवटी ८९ हजारांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी त्यात पुन्हा १ हजार रुपयांची वाढ होऊन भाव ९० हजार रुपये किलो झाले. सोन्याचे दर १ जुलै रोजी १५० रुपयांनी वाढले होते. त्यात मंगळवारी ५० रुपयांची वाढ होऊन सोने ७२३०० रुपये तोळा झाले. आठवडाभरात दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे बाजारपेठेच्या अभ्यासकांनी सांगितले
भारतीय रिझर्व्ह बँकेसह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याच्या खरेदीला ब्रेक लावल्याने दरवाढीला लगाम लागला. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यासारखा जूनमध्ये कोणताही रेकॉर्ड दोन्ही धातूंना नावे करता आला नाही. या महिन्याच्या अखेरीस बजेट 2024 सादर होणार आहे. त्यामुळे सोने आणि चांदी भरारी घेणार की, स्वस्त होणार याकडे ग्राहकांचे, गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.