जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या सुवर्ण नगरीत चांदी दराने कहर केला केला आहे. गेल्या २४ तासात चांदी दरात तब्बल २५ हजार ७५० रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. दरम्यान, एक किलोमागे १ हजारापासून ते २५ हजारांचा टप्पा गाठण्यासाठी चांदीला तब्बल ३५ वर्ष लागले. मात्र, तेवढा दर एका दिवसांत पार केला. या दरवाढीनंतर चांदी २,६५,७४० रुपये या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली.

गेल्या अनेक दिवसांपासून भाववाढ होत असलेली चांदी २५ डिसेंबर रोजी एक दिवस स्थिर राहिली. मात्र, त्यानंतर पुन्हा २६ व २७ डिसेंबर असे सलग दोन दिवस त्यात मोठी वाढ नोंदविली गेली.

बुलियन मार्केटच्या तज्ज्ञांच्या मते, २०२६ च्या पहिल्या सहामाहीत चांदी २.७५ ते ३ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, सध्या दर उच्चांकी पातळीवर आले. दरम्यान, सोन्याच्या दरात १९४७ रुपयांनी वाढ होत १,४४,६१२ वर पोहोचले.एकीकडे चांदीचा तुटवडा व दुसरीकडे जागतिक पातळीवर मागणी वाढत असल्याने तिच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.










