जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२६ । उच्चांकानंतर सोने दरात काल गुरुवारी घसरण दिसून आली. मात्र दुसऱ्याच दिवशी सोन्याचा दर पुन्हा वधारला. सोन्याच्या दरात तब्बल ५,४०० रुपयांनी वाढ झाली आहेत. दुसरीकडे चांदी दरातही मोठी उसळी दिसून आली. आज चांदी दरात तब्बल १५००० रुपयाची वाढ झाली. यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

सोन्याचे दरात विक्रमी वाढ
goodreturns वेबसाईटनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५४०० रुपयांनी वाढून १,५९,७१० रुपयावर पोहोचले आहे तर ८ ग्रॅममागे सोने ४,३२० रुपयांनी महागलं असून १,२७,७६८ रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४,९५० रुपयांनी वाढून १,४६,४०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३,९६० रुपयांची वाढ झाली असून हे दर १,१७,१२० रुपये झाले आहेत.

सोन्यासोबतच चांदी दरातही मोठी वाढ झाली. आज सकाळी बाजार उघडताच चांदी दरात तब्बल १५००० रुपयाची वाढ झाली. यामुळे चांदीचा एक किलोचा दर ३,४०,००० रुपयावर पोहोचला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर कर लादण्यापासूनही माघार घेतली, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत गुरुवारी मोठी घसरण झाली, परंतु आता अमेरिकन ग्राहक खर्च आणि रोजगार बाजारातील आकडेवारी मजबूत झाल्यामुळे डॉलरवर परिणाम झाला आहे. परिणामी, सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा त्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.






