जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२६ । आज नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकरसंक्रांतीला अनेकजण काहीतरी नवीन वस्तू घेतात. अनेकजण सोने-चांदी देखील खरेदी करतात. मात्र यंदा मकरसंक्रांतीला सोन्यासह चांदीच्या किमतीने ऐतिहासिक पातळी गाठली आहे.

आज देखील दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा १०९० रुपयांनी वाढला आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीने दरवाढीचा कहर केला आहे. आज बुधवारी चांदीचा दर प्रति किलो १५००० रुपयांनी वाढला आहे. यामुळे चांदीचा दर दोन लाखांच्या उंबरवठ्यावर आला आहे. ऐन मकरसंक्रांतीला झालेली दरवाढ पाहुन आता ग्राहक सोने- चांदी खरेदी करावी की नाही, या संभ्रमात पडले.

सोन्याचे दर किती?
आज सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १०९० रुपयांनी वाढून विनाजीएसटी १,४३,६२० रुपयावर पोहोचले आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,३१,६५० रुपये आहेत

चांदीचा दर
आज सकाळच्या सत्रात चांदी दरात १५००० रुपये प्रति किलोने वाढ झाली. यामुळे चांदीचा एक किलोचा भाव १,९०,००० रुपयावर पोहोचला आहे. औद्योगिक वापरासाठी वाढती मागणी आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे चांदीच्या दरांना मोठे बळ मिळाल्याचे सांगितले जात आहे.
जळगावात सोन्या-चांदीचा भाव काय?
मंगळवारी चांदी एका दिवसात तब्बल ९,७८५ हजारांनी वाढून प्रति किलो २,८३, २५० तसेच सोने १,४६, २६० रु. तोळ्यावर पोहोचले.
दरवाढी मागचे कारण काय?
आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव, प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या धोरणांबाबत असलेली अनिश्चितता आणि डॉलरच्या चढ-उतारांचा परिणाम यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंना मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्रमी वाढीचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात देशांतर्गत बाजारात सोन्या–चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात.





