जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२४ । या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन चार दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. 70 हजारावर गेलेला सोन्याचा दर 69 हजाराच्या घरात आला होता. मात्र आठवड्याच्या अखेरच्या सत्रात दोन्ही धातूंमध्ये वाढ दिसून आली. या दोन दिवसात सोन्यासह चांदीच्या दरात वाढ झाली. यामुळे आज रविवारी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीच्या झळा बसतील.
या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात नरमाईचे सत्र दिसले. सुरुवातीच्या चार दिवसांत सोने 1300 रुपयांनी उतरले. पण अखेरच्या दोन दिवसांत सोन्याने घोडे दामटले. भाव हजार रुपयांनी वधारले. 6 ऑगस्टला 870 रुपयांनी तर 7 ऑगस्टला 440 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 8 ऑगस्टला भाव स्थिर होता. 9 ऑगस्टला सोन्याने दिशा बदलली. 820 रुपयांची मुसंडी मारली. 10 ऑगस्टला त्यात 220 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यात चांदी 4200 रुपयांनी उतरली होती. पण अखरेच्या सत्रात चांदीने 1600 रुपयांची घौडदौड केली. 5 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली. 6 ऑगस्टला भाव 3200 रुपयांनी उतरले. त्यानंतरच्या दोन दिवसांत किंमती हजार रुपयांनी कमी झाल्या. शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी चांदी 1500 रुपयांनी तर 10 ऑगस्ट रोजी 100 रुपयांनी किंमत वाढली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,100 रुपये आहे.