दोन दिवसांत थकबाकी भरा, अन्यथा….महापालिकेचा गाळेधारकांना इशारा
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । जळगाव महानगरपालिकेने थकबाकीदार गाळेधारकांकडून सक्तीने वसुली सुरू केली असून थकबाकीदार गाळेधारकांना दोन दिवसात पैसे जमा करा अन्यथा गाळा सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता गाळेधारकांच्या हाती दोन दिवस शिल्लक राहिले आहे.
काल शुक्रवारी जुने बीजे मार्केटमध्ये कारवाईसाठी गेलेल्या दोन्ही उपायुक्तांच्या पथकांना पाहताच दुकाने पटापट बंद करण्यात आले. एका दुकानाला सील करण्याची प्रक्रीया केल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. दुपारी महापालिकेत झालेल्या बैठकीत पैसे भरणे हाच अंतिम मार्ग असल्याचे स्पष्ट करण्यात आले. वसुलीची जबाबदारी उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या सोबतीला उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यावर सोपवली आहे. दरम्यान, थकबाकीदार गाळेधारकांना पैसे जमा करा अन्यथा गाळा सील करण्याचा इशारा दिला. एका गाळ्याला सील करण्याची प्रक्रीयाही सुरू केली; परंतु दुकानदाराने दोन लाखांचा धनादेश देण्याची तयारी दाखवली. गाळेधारक एकत्र आल्याने गोंधळ सुरू झाला.
दरम्यान, पालिकेकडून थेट दुकाने सील करण्याची कारवाई सुरू झाल्याने धास्तावलेल्या दुकानदारांनी काही मिनिटात सर्व दुकाने बंद केली. प्रशासनाकडून गाळेधारकांना दिलेल्या बिलांमधील रकमा अवाजवी असून त्या कदापि भरता येणार नाहीत. बिलाच्या रकमांमधील दंड कमी करून नव्याने बिले द्यावीत, अशी मागणी या वेळी करण्यात अाली. तसेच पालिकेला कारवाई करू देणार नाही असा निर्धार करत प्रशासनाचा निषेध केला.