गोदावरी व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात उच्च शिक्षणाच्या संधी यावर मार्गदर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्राचे हित पाहणे हे कुठल्या एका व्यक्तीचे, समूहाचे अथवा धर्माचे काम नसून प्रत्येक भारतीयाचे ते मूलभूत कर्तव्य आहे असे प्रतिपादन शांभवीताई थिटे यांनी केले. गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २१ मार्च रोजी शांभवी थिटे यांनी उच्च शिक्षणाच्या भारत आणि भारताबाहेर असलेल्या संधी, शिक्षणातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. सुमारे दोन वर्षापूर्वी जे एन यु विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आंदोलन करून अवघ्या देशपातळीवर गाजलेल्या व अतिशय अभ्यासू व निडर व्यक्तिमत्व असलेल्या शांभवी अशी त्यांची ओळख आहे. त्या म्हणतात आपल्या चरित्राचा प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडत असतो, आपल्या शिक्षणाचा उपयोग हा देशाच्या आर्थिक सामाजिक व सार्वभौम विकासासाठी झाला पाहिजे असे परखड मत शांभवी ताईंनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी सरस्वती पूजन, दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक डॉ. प्रशांत वारके यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ केतकीताई पाटील ह्या होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी आय एम आर चे संचालक डॉ प्रशांत वारके, डॉ वर्षा पाटील एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ नीलिमा वारके उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. केतकी ताई पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात ज्ञान वाढले की आत्मविश्वास वाढतो. इतिहासातल्या चुका काढणे सोप्प आहे पण त्या चुका काढून त्या सुधारवून नवीन इतिहास मांडणे यासाठी हिंमत असावी लागते असे सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्नांचे समाधान शांभवी थिटे यांनी केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स महत्त्वाचे
पुढे बोलतांना शांभवी थिटे म्हणाल्या की, उच्च शिक्षणधारकांना भारत आणि भारताबाहेर असलेल्या संधी, मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था यासह भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय इतिहास, सांस्कृतिक अभ्यास करणे, सामाजिक विकास करण्याकरिता गरजेचे असून तसेच विविध भाषा शिकणे आवश्यक असल्याचे सांगितले.