प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिरात १५० हून अधिक रुग्णांची तपासणी; तज्ञांद्वारे ३० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२३ । गोदावरी फाऊंडेशन व रोटरी क्लब जळगाव इलाईटतर्फे स्व.सौ.सुमन जगन्नाथ महाजन यांच्या स्मरणार्थ आज शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे उद्घाटन डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्यासह अतिथी असलेले डॉ.पंकज जिंदाल, डॉ.शंकर सुब्रमण्यम, डॉ.जरीवाला, डॉ.पंडित यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
शिबिरासाठी सकाळपासूनच रुग्णालयात दुरदूरवरुन आलेल्या रुग्णांची गर्दी झाली होती. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त जटील शस्त्रक्रियांचा अनुभव असलेले पुणे येथील डॉ.पंकज जिंदल, मुंबई येथील डॉ.शंकर सुब्रमण्यम, सुरत येथून हॅण्ड सर्जन डॉ.मौली जरीवाला, पुणे येथून प्लास्टीक सर्जन डॉ.प्रांजल पंडित या तज्ञांद्वारे तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. या शिबिरात चिटकलेली बोटे, जळालेले व्यंग, वाकडी बोटे, पायाचे व शरिावरील व्यंग, दुभंगलेले ओठ व टाळू अशा विविध व्यंगावर उपचार करण्यात आले.
सर्वप्रथम तज्ञांद्वारे आलेल्या १५० हून अधिक रुग्णांची तपासणी (स्क्रिनिंग) करण्यात आली असून त्यापैकी शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या ३० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. दिवसभरात शस्त्रक्रिया सुरु असून उर्वरित रुग्णांवर रविवार दिनांक २६ रोजी शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना औषधींचे देखील वितरण करण्यात आले. याप्रसंगी रोटरी इलाईटचे अध्यक्ष रो अजित महाजन, सचिव अभिषेक निरखे, मेडिकल सर्विस डायरेक्टर डॉ.वैभव पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ.वैजयंती पाध्ये, सदस्य नितीन इंगळे, संदिप आसोदेकर, डॉ.गोविंद मंत्री, डॉ.श्रीधर पाटील, डॉ.पंकज शहा, किशोर महाजन, तनुजा महाजन, बिना चौधरी, प्रतिभा कोकांडे, ओम सिंग, राजीव बियाणी, धनंजय ढाके, निलेश झंवर, रुपेश सरोदे, अमित बेहेडे, प्रितम लाठी आदि उपस्थीत होते. रविवारी दुपारी ४ वाजता शिबिराचा समारोप गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या उपस्थीतीत होणार आहे.
शिबिरामुळे मी आता लिहू शकतेयं – श्रद्धा शिंदे
बालपणापासूनच माझ्या हाताची बोटे चिकटलेली होती, त्यामुळे अनेक वर्ष मला उजव्या हाताने लिहिता येत नव्हते, जेवणही करता येत नव्हते, मात्र या शिबिराची माहिती मिळाली आणि तेथे सुरवातीपासूनच मोफत उपचार व शस्त्रक्रिया झाल्यात, त्यामुळे मी आज माझ्या उजव्या हाताने लिहू शकतेय, जेवण करु शकतेयं, पूर्ण बरे होण्यासाठी आज तिसरी शस्त्रक्रिया येथे होत आहे, त्यामुळे मी आयोजकांचे आभार मानते.