जळगाव लाईव्ह न्यूज । महायुती सरकारने नाशिक आणि रायगड जिल्ह्यांमधील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती झाली होती. मात्र काही तासात नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाली. दरम्यान यावर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नाशिकमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजा संपन्न झाली. या पूजेसाठी मंत्री गिरीश महाजन सपत्नीक उपस्थित होते. दरवर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा पार पडते, परंतु यंदा नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती असल्याने महापूजेचा मान कुणाला याबाबत चर्चा सुरू होती. गिरीश महाजन यांनी या पूजेबद्दल बोलताना म्हटले, “मला दुसऱ्यांदा योग आला. काल अमित भाई सोबत आलो. आज पुन्हा पूजेसाठी आलो. मी चौथ्यांदा पूजा करतोय.”
नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले, “पालकमंत्री पदाबाबत देवाला माहिती. आपल्याकडे 33 कोटी देव आहेत. रायगड आणि नाशिक बाबत चर्चा करून प्रश्न सुटेल.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्यापूर्वी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली होती, परंतु शिवसेना आणि भाजपामधील मतभेदामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.
गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्याबद्दलही माहिती दिली. “कुंभ मेळ्याबाबत विस्तृत बैठक झाली आहे. सर्व खात्याचे सचिव होते, सर्व अधिकारी होते, वेळ कमी आहे. तयारी लवकर करावी लागणार. प्रयागराजला व्यवस्था पाहण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन जाणार आहे. तिथल्या चांगल्या वेंडरशी बोलणार आहे,” असं ते म्हणाले.
छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन म्हणाले, “मला वाटतं तो कार्यक्रम भाजपचा नव्हता. सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले होते, ते भाजपच्या कार्यक्रमाला आले नव्हते. भुजबळ साहेब जेष्ठ नेते, सिनियर आहेत. साहजिक आहे खुर्ची दिली. मी लहान कार्यकर्ता आहे. त्यांच्या प्रवेशाबाबत वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे.”