जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२४ । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याबाबत जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक यांना धमकावल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता गिरीश महाजन यांनी या प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.
“अनिल देशमुख आणि त्यांच्या नेत्यांनी माझ्याविरोधात कटकारस्थान केलं हे सिद्ध झालय. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे गुन्हा दाखल करत नव्हते. ते महिनाभर थांबले. पुण्यात घटना घडली आणि 3 वर्ष 12 दिवसांनी जळगाव जिल्ह्यात 650 किलोमीटर अंतरावर निंबोऱ्यात गुन्हा कसा नोंदवायचा? यासाठी ते तयार नव्हते” असं गिरीश महाजन म्हणाले.
“अनिल देशमुखांनी त्यांच्यावर खूप दडपण आणलं. अत्यंत खालच्या भाषेत एसपींबरोबर बोलले. एसपी प्रवीण मुंडे माझ्याशी बोलले, त्यांनी मला सांगितलं, भाऊ माझ्यावर दडपण आणलं जातय. निलंबित करण्याची धमकी दिली जातेय” असा दावा गिरीश महाजन यांनी केला. “मी स्वत: या संदर्भात अनिल देशमुखांना भेटलो. ते म्हणाले मी हतबल आहे. माझ्यावर वरिष्ठांच दडपण आहे. माझ्यासमोर त्यांना विचारा, गिरीश महाजन तुम्हाला कितीवेळा भेटले? त्यांनी मला सांगितलं, माझ्यावर दडपण आहे, तुम्ही पवारसाहेबांना भेटून घ्या, तरच मी तुमची काही मदत करु शकेन” असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला.