जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर भाजपचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एक सूचक वक्तव्य केले. उत्तर प्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असे गिरीश महाजन म्हणाले. पाच राज्यांच्या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर लवकरच दिसून येतील, असेही गिरीश महाजन म्हणाले.
उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने मजल मारली, दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.
या निकालावर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असे म्हणत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सर्व एग्झिट पोल फेल ठरतील असेही म्हटले आहे. पाचही राज्यात काँग्रेसने एकुण ६९० च्या आसपास जागा लढवल्या, काँग्रेसला एकुण ३५ जागाही मिळत नाहीयेत असेही ते म्हणाले.
दरम्यान, गिरीश महाजनांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.’महाराष्ट्र बाकी आहे असं म्हणत असाल तर महाराष्ट्र तयार आहे,’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. ‘यूपी किंवा इतर राज्यांतील निकालामुळं महाराष्ट्रात कुठलाही मोठा बदल होणार नाही. मोठ्या बदलासाठी भाजपला आणखी काही वर्षे थांबावं लागेल, असं पवार म्हणाले. ‘हा निकाल लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील पक्ष अधिक जबाबदारीनं कष्ट घेतील, असंही त्यांनी सांगितलं.