जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । घरकुल घोटाळ्यातील दोषी ठरवले गेलेले आरोपी तथा चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला.प्रा. सोनवणे यांनी शिक्षेस स्थगिती मिळवण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने पहिल्याच सुनावणीत फेटाळून लावला आहे. त्यामुळे प्रा. सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ आरोपींना धुळ्याच्या विषेश न्यायालयाने दोषी ठरवून ३१ ऑगस्ट २०१९ रोजी शिक्षा ठोठावली आहे. जैन यांना ७ वर्षे कारावास व १०० कोटी रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यामुळे या गुन्ह्यातील अनेक राजकीय व्यक्तींना निवडणूक लढवता येणार नसल्याची परिस्थिती आहे.
निवडणूक लढवण्यासाठी एकतर निर्दोष होणे किंवा दिलेल्या शिक्षेस स्थगिती मिळवणे असे पर्याय आरोपींसमोर आहेत. या गुन्ह्यात चोपडा येथील शिवसेनेचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना ४ वर्षे कारावास व १ लाख ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रा. सोनवणे यांनी शिक्षेस स्थगिती मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता.
त्यावर बुधवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व आहुजा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. पहिल्याच सुनावणीत न्यायालयाने प्रा. सोनवणेंचा अर्ज फेटाळून लावला. सरकारपक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण यांनी काम पाहिले. या निकालामुळे घरकुल घोटाळ्यात आरोपी असलेल्या राजकीय व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे. सोनवणे यांच्यासह आणखी काही जणांनी शिक्षेस स्थगिती मिळवण्याचे अर्ज केल्याचे समजते.