जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२३ । आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. घरगुती गॅस कंपन्यांनी दीर्घ कालावधीनंतर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (Gas Cylinder Price) दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये झाली आहे. आतापर्यंत हे सिलिंडर 1053 रुपयांना मिळत होते. नवीन दर १ मार्चपासून लागू झाले आहेत. यापूर्वी 6 जुलै 2022 रोजी तेल कंपन्यांनी दरात वाढ केली होती. त्यावेळीही कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करून ती १०५३ रुपयांपर्यंत वाढवली होती.
कालपर्यंत हा दर 1769 रुपये होता.
गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र त्यानंतर तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. यावेळी कंपन्यांनी 350.50 रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीमुळे गॅस सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये झाली आहे. यापूर्वी हा सिलिंडर १७६९ रुपयांना मिळत होता. 1 जानेवारी रोजी या सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढली होती.
यापूर्वी गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घसरण होताना दिसत होती. 1 मे 2022 रोजी, व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत विक्रमी 2355.50 इतकी होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. यापूर्वी 6 जुलै 2022 रोजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.