जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये छापा टाकून पोलिसांनी लाखो रुपयांचा ओला गांजा जप्त केला आहे. ५६ किलो ९७० ग्रॅम वजनाचा गांजा आणि वाहनासह एकूण १९.३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सून या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका पांढऱ्या बोलेरो पिकअप (एमएच १८ एजे ०२२३) मधून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यानुसार, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डीवायएसपी विनायक कोते यांच्या परवानगीने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत हा छापा टाकण्यात आला.
शुक्रवार (दि.28) रोजी रात्री १०:५० वाजता पोलिसांनी जळोद रस्त्यावर उड्डाण पुलाजवळ एका संशयित वाहनास थांबिवले. या वाहनाच्या तपासणीत पोलीसांना एकूण १८ पॅकेटमध्ये भरलेला ५६ किलो ९७० ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा सापडला. ज्याची बाजारातील किंमत ११.३९ लाख रुपये आहे. तसेच, ८ लाख रुपये किमतीची बोलेरो वाहनही जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मनोज सोनू पावरा (२४, महादेव सोनपाडा, ता. शिरपूर) आणि सीताराम वेळू सोनवणे (५२, वलवाडी, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. अमळनेर पोलीस पुढील तपास करीत आहेत.