जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील २६७४ शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कृषिपंपाद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेतील शेतकरी वीजबिलाच्या कटकटीतून मुक्त झाले आहे.यासह कृषी पंपाचा खर्चही शून्य असल्याने शेतकऱ्यांचा याकडे कल वाढला आहे.या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २६७४ शेतकऱ्यांकडे तीन,पाच व ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषीपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवसा विनाव्यत्यय वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे.
पारंपरिक पद्धतीने कृषिपंपाची वीजजोडणी न झालेले व महावितरणकडे वीज जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी पारेषणविरहित नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहे. तसेच अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी सौर कृषिपंपाच्या आधारभूत किमतीपैकी सर्वसाधारण गटासाठी १० टक्के तर अनुसूचित जाती, जमाती गटातील शेतकऱ्यांसाठी ५ टक्के लाभार्थी हिस्सा आहे. या योजनेंतर्गत एक लाख सौर कृषिपंप देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत आले असल्याची माहितीही महावितरणच्या सूत्रांनी दिली. आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषिपंपासाठी ५ वर्षे व पॅनेलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखभालीचा खर्च देखील शून्य आहे.अडचणींवर पर्याय कृषिपंप ग्राहकांना पारंपरिक पद्धतीने विद्युत रोहित्र उभारून लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो; मात्र लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्याने कमी दाबाने वीजपुरवठा,वारंवार बिघाड होतो. मात्र सौर पंपामुळे ही समस्या सुटली आहे.
यांना दाखवला जाताे सौरपंपाचा मार्ग
ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व शेतीच्या सिंचनाकरिता पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा उपलब्ध नाही. विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नाही. अतिदुर्गम भागातील व शासनाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सौरपंपाचा मार्ग दाखवला जात असल्याचेही महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.