जळगाव लाईव्ह न्यूज । शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना गंडा घातला जात असून जळगावातून असाच एक प्रकार समोर आला आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफ्याचे आमिष दाखवून 53 लाख 65 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींकडून आतापर्यंत 11 लाख 83 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 10 जून ते 31 जुलै 2024 दरम्यान व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘अमित मालविया’, ‘आदित्य जैन’, ‘विजय कुमार’ अशा नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी ‘रायझ-पिरॅमिड एलिट’ या प्रकल्पात गुंतवणुकीसाठी संपर्क साधला.नफा झाल्यानंतर धर्मदाय कार्यासाठी 20 टक्के रक्कम दान करण्याचे खोटे सांगत विविध बँक खात्यांमध्ये एकूण 53.65 लाख रुपये ऑनलाईन आरटीजीएस / एनईएफटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करून घेतले. मात्र त्यानंतर कोणताही परतावा न करता आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दिगंबर थोरात, दिलीप चिचोले व हारुण पिंजारी यांच्या पथकाने केला. त्यांनी गुजरात राज्यातील गिर-सोमनाथ जिल्ह्यातील वेरावल येथून कांजीभाई भिकाभाई जादव (वय 42, व्यवसाय – फायनान्स कन्सल्टन्सी) याला 29 एप्रिल रोजी अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने एक एनजीओ स्थापन करून त्याचे चालू बँक खाते उघडले व त्यामार्फत ‘डोनेशन’च्या नावाखाली सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारली. कागदोपत्रांमध्ये त्या रकमेचा वापर सामाजिक कार्यासाठी केल्याचे दाखवण्यात आले आहे.
येथे करा तक्रार नोंदवा
सायबर पोलीस स्टेशन, जळगाव यांच्याकडून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली येणाऱ्या नफ्याच्या आमिषांना बळी पडू नये. अनोळखी अॅप्स किंवा वेबसाईटवर आपली माहिती नोंदवू नये. फसवणूक झाल्यास 1930 या टोल फ्री क्रमांकावर किंवा Cybercrime.gov.in या पोर्टलवर तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.