जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२४ । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शनिवारच्या रात्री दाणाबाजारात एकाच चोरट्याने चार दुकाने फोडून रोकड लंपास केली. तर महामार्गालगत पंढरपूर नगरात रात्री अडीच वाजेच्या सुमारास चार घरांचे कुलूप तोडून रोकड व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. कुसुंबा गावातील बंद घरातूनही दागिने लंपास झाले आहेत. सुमारे पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.
गेल्या महिन्यानंतर दोन दिवसांपूर्वी पीयूष बियाणी यांचे तेलाचे दुकान फोडून रोकड लंपास केलेल्या चोरट्याने गुरुवारच्या रात्रीतून दाणाबाजारातील समोरासमोर असलेली चार दुकाने फोडून रोकड लंपास केली. पहाटे चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान या चोऱ्या झाल्या आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी व शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. राधाकृष्ण वलभानी यांचे जयहिंद ट्रेडिंग कंपनी या नावाने तेलाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ड्रॉवरमधून ३० हजारांची रोकड लंपास केली आहे .
पंढरपूर नगरात बंगल्यात चोरी
महामार्गावर भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पंढरपूर नगरात शनिवारच्या रात्री अडीच वाजेच्या सुमारास झोपडीपासून बंगल्यापर्यंत चार ठिकाणी घरफोड्या झाल्या. वॉचमनच्या झोपडीतून चोरट्यांनी मोबाइल लंपास केला. तेथून पुढे असलेल्या निवृत्ती मुतरकर यांच्या घरातून १० हजार रुपयांची रोकड व साडेतीन ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लंपास केले. जवळच टाटा शोरूममध्ये कामाला असलेले धीरज वाघ यांचे घर आहे. वाघ हे सिहोर व उज्जैन येथे दर्शनासाठी आई, पत्नी, बहिणीसह गेले होते. त्यांच्या घरातील २ लाखांची रोकड व एक लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. बहिणीची नुकतीच फारकत झाल्याने लग्नात दिलेली ही रक्कमपरत मिळाल्याने त्यांनी घरात ठेवली होती.
त्यांच्या शेजारी झंवर यांचे लक्ष्मीनारायण झंवर अॅण्ड सन्स नावाने धान्याचे दुकान आहे. या दुकानातील ड्रॉवरमधून १५ ते २० हजार रुपयांच्या २० व १०० रुपयांच्या नोटांचे बंडल लंपास केले. या वेळी चोरट्याकडून एक ड्रॉवर न उघडल्याने त्यातील रक्कम बचावली. या दोन्ही दुकानाच्या समोर भरत गांधी यांचे दर्शन ट्रेडिंग नावाचे गुळाचे दुकानही चोरट्याने फोडले. त्यांच्या दुकानातून ४५६० रुपये लंपास केले. त्याच्या शेजारी तेजस मेहता यांचे राज ट्रेडिंग हे दुकान चोरट्याने फोडले. त्यातील ड्रॉवरमधून २ हजार रुपयांची चिल्लर नाणी ड्रॉवरमधून बाहेर काढून काउंटरवर ठेवून चोरटा निघून गेला.