जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी मोहिम सुरु असून या मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेत मोठे गैरप्रकार उघडकीस येत आहेत. प्रमाणपत्रातील दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत तफावत आढळून आल्याने आणखी चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत ८ जण निलंबित झाले असून इतरही काही कर्मचारी रडारवर आहे.

राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कर्मचारी यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान दिव्यांग टक्केवारी तफावत आढळून आलेल्या कर्मचाऱ्याविरुध्द निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेतील आणखी चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे आरोग्य सहायक भालचंद्र नारायण पवार, वाघोड येथील आरोग्य सहायिका छाया घनश्याम भोळे, तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक संदीप विनायक सोनवणे, पिंपरखेड आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक गणेश मुरलीधर महाजन यांचा समावेश आहे.

यापूर्वी देखील तपासणी मोहिमेत दोषी आढळलेल्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता नव्याने ४ जणांची भर पडल्याने, जिल्हा परिषदेने आतापर्यंत एकूण ८ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, अजून अनेक कर्मचारी जिल्हा परिषदेच्या रडारवर आहेत.



