जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदाराला अटक करण्यात आलीय. अमळनेरचे शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर दरोडा आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आला होता, त्या प्रकरणात नंदुरबार पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?
नगरपालिका निवडणुकीनंतर माजी आमदार चौधरी यांचे पुत्र प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. या निवडीनंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्याच रात्री संतप्त जमावाकडून शिरीष चौधरी यांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या.

यामध्ये चौधरी यांच्यावर दरोडा आणि अॅट्रोसिटी (जातीय शिवीगाळ व अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात नंदुरबार पोलिसांनी आज शिरीष चौधरी यांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, चौधरी यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलिसांनी जेरबंद केले आहे. शिरीष चौधरी यांना अटक झाल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून आता पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, माजी आमदार शिरीष चौधरी यांचे कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सत्तेचा माज करत सर्वसामान्यांना धमकवत आहेत. इतकेच नाही तर गुजरातमध्ये बनावट दारू विक्री आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांत हे कुटुंब गुंतलेले असल्याचा आरोप अमळनेरचे अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी केलाय.



