जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२५ । चाळीसगाव वन विभागाने एक मोठी कारवाई केली. ज्यात चाळीसगाव बायपास पासून धुळे शहरापर्यंत पाठलाग करत शिकार केलेल्या पाच मृत हरणांसह एक इनोव्हा कार पकडली आहे. कारमधील पाच संशयित हे कार सोडून पसार झाले असून वन विभाग त्यांच्या शोध घेत आहेत.

जंगलातील हरणांची शिकार करुन त्यांच्या मांसाची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना मिळाली होती. त्यानुसार, नगराळेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटेच्या सुमारास बिलाखेड गावाजवळ सापळा रचला. पथक दवा धरूण संबंधित वाहनाची वाट पाहत असताना पहाटे ४ वाजेच्या सुमारास एमएच. ४१ सी ९६९१ या क्रमांकाची इनोव्हा कार चाळीसगाव-धुळे बायपास रस्त्यावरुन छत्रपती संभाजीनगरकडून धुळेकडे जाताना भरधाव वेगाने जात असताना दिसली. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी इनोव्हाला हात देऊन ती थांबवण्याचा इशारा केला. मात्र, इनोव्हा कार धुळेच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाली.
चाळीसगाव ते धुळे पाठलागाचा थरार
पथकाचा संशय बळावल्याने नगराळेसह सहकाऱ्यांनी इनोव्हाचा पाठलाग सुरु केला. इनोव्हा कार पुढे व वन विभागाची गाडी मागे असा चाळीसगाव ते धुळे आम्ही पाठलाग करीत होतो. अखेर धुळे शहरात आल्यानंतर इनोव्हा चालकाने थांबवली व आपला पाठलाग सुरु असल्याचे लक्षात आल्याने इनोव्हामधील पाच जण कार सोडून फरार झाले. आम्ही इनोव्हा कारची तपासणी केली असता, त्यात पाच हरणे मृतावस्थेत आढळून आले. ज्यात दोन नर व तीन मादींचा समावेश आहे.
ही कारवाई यांनी केली
वन विभागाने मृत हरीण व कार जप्त केली असून पसार झालेल्या शिकारींचा आम्ही शोध सुरु असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी दिली. ही कारवाई उप वनसंरक्षक प्रवीण ए.व सहाय्यक वन संरक्षक उमेश बिरासदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, वनपाल चंद्रशेखर पाटील, ललित पाटील, अजय महिरे, काळू पवार, रवींद्र पवार, भटू अहिरे, संजय गायकवाड, समाधान मराठे यांनी केली.