⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवान्यासाठी १ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१। अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती. दरम्यान, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीला यश आले असून सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना घेण्यासाठी १ जानेवारी २०२२ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अन्न व्यवसाय करणाऱ्यांसाठी अन्न सुरक्षा व मानके अधिनियमनांतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच अन्न व्यवसाय करणे आवश्यक असल्याने अन्न परवाना नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, खाद्यपदार्थ विक्रेता व्यापाऱ्याकडे माल घेण्यासाठी गेल्यावर व्यापाऱ्याला त्याचा नोंदणी क्रमांक तपासावा लागणार आहे, तसेच तो व्हॅलिड आहे की नाही याची देखील ऑनलाईन तपासणी करावी लागणार आहे. एखाद्याचा परवाना रद्द केला असल्यास त्याला माल देता येणार नाही, बिलावर क्रमांक न घेता माल दिल्यास संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. व्यापाऱ्यांवर मोठी जबाबदारी असल्याने यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात होती. यासाठी व्यापारी संघटनांनी केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला होता. व्यापारी संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याची दाखल घेत प्राधिकरणाकडून परवान्यासाठी १ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यावे
दरम्यान, मुदतवाढीचे स्वागत करत सरकारने कोणतेही कायदे करतांना व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी कॅट संघटनेचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा यांनी केली आहे.