जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातून तब्बल पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार असून त्यामुळे जिल्ह्याच्या दळणवळण आणि विकासाला चालना मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.

NH-53 – हा सुरत (गुजरात) ते पारादीप (ओडिशा) पर्यंतचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून जो धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमधून जातो. आणि हाजिरा बंदराला पारादीप बंदराशी जोडतो.

NH-753F – हा महामार्ग जळगावहून पहूर, फर्दापूर, अजिंठा, सिल्लोड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, नेवासा, वडाळा, अहिल्यानगर, पुणे, मावळ, दिगी पोर्टपर्यंत आहे. जळगावमधून पुणे जाण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या या महामार्ग आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास जळगावहून समृद्धी महामार्गाने मुंबई किंवा नागपूरकडे कमी वेळात पोहोचणे शक्य होईल. पुणे-छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस हायवे अस्तित्वात आल्यानंतर जळगावहून पुण्याला देखील अवघ्या तीन तासांत पोहोचणे शक्य होणार आहे.

NH-753J – महामार्ग जळगावहून मनमाडकडे जाणारा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. जो पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, नांदगाव मार्गे मनमाडपर्यंत जातो. या महामार्गाचे विस्तारीकरण (दुपदरी ते चारपदरी) करण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला असून, त्याचे बरेच काम पूर्णत्वास आले आहे. वळणावरील भूसंपादनाचा तिढा वेळेवर न सुटल्याने रखडलेल्या या महामार्गासाठी आता पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. कमी वर्दळीच्या या महामार्गाने जळगावहून मनमाड, चांदवडमार्गे थेट नाशिक देखील गाठता येते.
NH-753 L- हा इंदूरहून हैदराबादकडे जात असलेला राष्ट्रीय महामार्ग आहे. कृषी व औद्योगिक विकासाला नवे बळ देऊ शकणाऱ्या या महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. भारतमाला परियोजनेच्या पहिल्या टप्प्याचा भाग असलेल्या आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा या तीन राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपये निधी मंजूर आहे. हा महामार्ग जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमार्गे तेलंगणातील हैदराबादपर्यंत जाणार आहे. यामुळे इंदूर आणि हैदराबादमधील अंतर सुमारे १५० किलोमीटरने कमी होणार आहे. जळगावहून इंदूरला त्यामुळे फक्त चार तासांत पोहोचता येईल.
NH-753B – हा महामार्ग मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरपासून गुजरात राज्यातील अंकलेश्वरपर्यंत असणार आहे. तो बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातून जाणार आहे.





