शासकीय जागेवर अतिक्रमण करणे भाेवले, यावल तालुक्यातील ‘या’ ग्रा.पं.चे पाच सदस्य अपात्र
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । यावल तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांना शासकीय जागेवर अतिक्रमण करणे चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी पाच सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. शनिवारी या संदर्भातील आदेश जिल्हा प्रशासनाने काढले असून एकूण १३ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत पूर्वी एका सदस्याने राजीनामा दिल्याने उर्वरित १२ पैकी आता केवळ ७ सदस्य राहिले आहेत. दरम्यान या आदेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतानाच याबाबत तक्रारी झाल्या होत्या. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने ते निवडून अाले हाेते.
सावखेडासिम ही १३ सदस्य असलेली ग्रामपंचायत गतवर्षी निवडणुकीत अंगणवाडी सेविका सदस्य म्हणून निवडल्या होत्या. त्यांनी नंतर सदस्य पदाचा राजीनामा दिला. उर्वरीत १२ पैकी सहा सदस्यांविरोधात दोन जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा दुरुपयोग करून अतिक्रमण केल्याची तक्रार केली होती.
सलीम मुसा तडवी यांनी ग्रा.पं. सदस्य मुस्तफा रमजान तडवी, सिकंदर इब्राहिम तडवी व साधना अकबर तडवी यांच्या विरोधात तर ताहेर लतीफ तडवी यांनी ग्रा.पं. सदस्य नबाब मेहमूद तडवी, अलिशान सलीम तडवी व मुबारक सुभेदार तडवी यांच्या विरुद्ध तक्रार केली होती. यातील मुबारक तडवी वगळता इतर पाच जणांवर आरोप सिद्ध झाल्याने शनिवारी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी पाच सदस्यांना अपात्र घोषित केल्याचे आदेश काढले. या प्रकरणात अॅड.एन.आर. पाटील यांनी कामकाज पाहिले.