जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२५ । जळगावसह राज्यात मागच्या काही दिवसापासून पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून यामुळे जळगाव जिल्ह्यात अजून काही दिवस पावसाचा मुक्काम वाढणार आहे. ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अशातच हवामान खात्यानं जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज वर्तविला आहे. आगामी तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त झाला असतांना, हवामान विभागाकडून आगामी दोन दिवस पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या दर्शनाला तीन दिवस पावसाचे विघ्न कायम राहणार असून तर शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढणार आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांनी धोक्यात आली होती. मात्र १५ ऑगस्टपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार आगमन केलं. जिल्ह्यातील काही तालुक्यांना मुसळधार पावसाने झोपडून काढलं होते. या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली, तर दुसरीकडे काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. आता मागच्या दोन आठवड्यापासून जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ सुरु असून त्यात अधूनमधून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. या सततच्या पावसाने खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे

सततच्या पावसाने शेतात पाणी साचून खरीप पिके पिवळी पडत आहेत. ढगाळ वातावरणामुळे किडीचा देखील मोठा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. परिणामी, पिकांची वाढ खुंटली असून,उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. आता पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील आगामी पाच दिवसांचा अंदाज…
दिनांक आणि वातावरणाची स्थिती…
२९ ऑगस्ट : ऑगस्ट वादळी पावसाचा अंदाज (यलो अलर्ट)
३० ऑगस्ट : विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज (यलो अलर्ट)
३१ ऑगस्ट : वादळी पावसाचा अंदाज (यलो अलर्ट)
१ सप्टेंबर : मध्यम पावसाचा अंदाज
२ सप्टेंबर : मध्यम ते तुरळक पावसाचा अंदाज





