जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानासमोर असलेल्या समर एजन्सी या इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आलीय. ज्यात कुलर, फ्रिजसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाले असून जवळपास ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

याबाबत असे की, शहरातील शिवतीर्थ मैदानासमोर समर एजन्सी इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. याच दुकानाला मध्यरात्री आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या तब्बल आठ ते दहा बंबांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना तब्बल चार ते पाच तास लागले. अखेर पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या साऱ्या कालावधीत महापालिका, पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्यात सहभाग घेतला.
या आगीत दुकानातील लाखो रुपयांची इलेक्ट्रॉनिक उत्पादने, विशेषतः नवीन कुलर, फ्रिज, पंखे, मिक्सर, ग्राइंडर इत्यादी संपूर्णपणे नष्ट झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एवढ्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे दुकानमालक संकटात सापडला आहे.दुकानमालकाने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून, आग लागण्यामागील नेमका कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.