⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | ..अखेर एलसीबी निरीक्षक पदी किसनराव नजन-पाटील यांचीच नियुक्ती

..अखेर एलसीबी निरीक्षक पदी किसनराव नजन-पाटील यांचीच नियुक्ती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या निलंबनानंतर पाचोरा पोलिस ठाण्याचे प्रभारी किसनराव नजन पाटील यांची एलसीबीच्या प्रभारी निरीक्षकपदी पोलिस अधीक्षकांनी गुरुवारी रात्री बदली केली होती. तर किसनराव नजन-पाटलांनी शुक्रवारी दुपारी पदभार स्वीकारताच नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक बी.जी.शेखर-पाटील यांनी नजन-पाटलांच्या एलसीबी बदलीला स्थगिती दिली होती. त्यानंतर जालिंदर पळे यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, किसनराव नजन पाटील यांचीच पुन्हा नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना निलंबीत करण्यात आले होते. बकाले यांच्या निलंबनानंतर त्यांच्या जागेवर पाचोरा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा तात्पुरता पदभार सोपवण्याबाबत पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी आदेश काढले होते. त्यात पाचोरा पोलिस ठाण्यासह एलसीबीचा प्रभारी पदभार असण्याचा उल्लेखही होता तर किसनराव नजन-पाटील यांनी दुसऱ्या दिवशी दुपारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत येवून पदाची सूत्रेदेखील स्वीकारली मात्र काही तासातच आयजी बी.जी.शेखर यांनी पोलिस अधीक्षकांचा आदेश फिरवत या नियुक्तीला स्थगिती दिली होती.

पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या ऐवजी एलसीबीची धुरा एपीआय जालिंदर पळे यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आली होती. दरम्यान, एलसीबी निरीक्षक पदी किसनराव नजन पाटील यांचीच वर्णी लागली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी आदेशावर बुधवारी रात्री शिक्कामोर्तब केले असून गुरुवारी नजन पाटील यांनी पदभार देखील स्वीकारला आहे.

एलसीबीचे नूतन पोलीस अधीक्षक किसनराव नजन-पाटील हे डॅशिंग अधिकारी म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत. तसेच स्वभाव शांत आणि कायद्याचे भोक्ते असल्यामुळे हा पदभार त्यांच्याकडे कायम ठेवला जाण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. परंतू त्यांचे विभागीय पोलीस अधिकारी म्हणून प्रमोशन अवघ्या काही महिन्यात होणार असल्याचे कळते. जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर जळगाव शहर, चोपडा, भुसावळ, पाचोरा पोलीस स्थानक असा नजन पाटील यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.