⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

महिलांबाबत नेहमी आदराचीच भावना : ना.गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । बोदवड येथील एका कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी खा.हेमामालिनी यांचे उदाहरण देत वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत होती. दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असून माझ्या मनात महिलांबद्दल नेहमी आदराचीच भावना आहे. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे ना.गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सोशल मीडियात पोस्ट करून म्हटले की, जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे कार्यक्रमात मी रस्त्यांबाबत वक्तव्य केले होते. चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्यामागे होती. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असा खुलासा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

 

 





प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे तसेच महिलांविषयीही आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना होती, आजही आहे आणि यापुढेही राहील असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.